Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या

  • Home
  • India
  • Pune
  • Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या

Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या Kustimallavidya - The Legacy of Indian Wrestling 🇮🇳🤼‍♂️ Dedicated to India's traditional wrestling, legendary akhadas & wrestlers' stories.
(3998)

Explore history, techniques & inspiring journeys This is the official page of kustimallavidya orgnisation of maharashtra (india). we are goverment of india registered orgnisation working last 10 years sprading awareness of wresling of maharashtra

भारतीय कुस्तीवर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा मल्ल अमन सहरावत याचे एशियन गेम्स जपान 2026 मध्ये सुवर्णपदक : त्याच्या कामगिरी...
03/10/2026

भारतीय कुस्तीवर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा मल्ल अमन सहरावत याचे एशियन गेम्स जपान 2026 मध्ये सुवर्णपदक : त्याच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख....

श्वास रोखून धरायला लावणारी ती वेळ. डोळ्यांत अंगार आणि अंगात सळसळते रक्त. मॅटवर उभ्या असलेल्या त्या २३ वर्षांच्या पोराच्या नजरेत एक भयानक शांतता होती. समोर उभा होता उत्तर कोरियाचा जगज्जेता चोंग सोंग हान. हा सामना सोपा नव्हता. जगज्जेत्याला नमवणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखेच. पण भारतीय लाल मातीत घडलेला हा वाघ मागे हटणार नव्हता. शिट्टी वाजली आणि वाऱ्याच्या वेगाने आक्रमण सुरू झाले! एका क्षणाचीही उसंत नाही. अंगावर झेपावणाऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक आक्रमक चालीला त्याने दिलेले सडेतोड उत्तर बघून संपूर्ण स्टेडियम अवाक् झाले होते. ११-७ अशा फरकाने जगज्जेत्याचा धुव्वा उडवत त्याने एशियन गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. २०२३ च्या हांगझोऊ एशियन गेम्समधील त्याच्या कांस्यपदकाचे आज एका झळाळत्या सुवर्णपदकात रूपांतर झाले होते. याच मंचावर ६५ किलो गटात सुजित कलकल यानेही सुवर्ण जिंकत कुस्तीत भारताचे वर्चस्व सिद्ध केले, पण अमनची ती सुवर्णझेप एका महाभयंकर संघर्षातून आलेली होती.

या झंझावाताची सुरुवात कुठून झाली? नियतीने या पोराच्या आयुष्यात सुरुवातीलाच एक भयंकर डाव टाकला होता. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्याच्या डोक्यावरची आईची सावली हरपली. आईच्या जाण्याचे दुःख आणि डोळ्यांतील अश्रू सुकत नाहीत तोच, अकराव्या वर्षी वडिलांचे छत्रही हिरावून घेतले गेले. पोरका झाला तो! डोक्यावरचे आभाळ आणि पायाखालची जमीन दोन्ही एकाच वेळी सरकले. चहुबाजूंनी फक्त काळोख... भीषण काळोख! अनाथ झालेल्या या कोवळ्या जीवाचा आधार कोण? अशा या जीवघेण्या आणीबाणीच्या काळात त्याला भक्कम साथ मिळाली ती त्याच्या चुलत्यांची. काकांनी दिलेला तो आधार त्याच्यासाठी खडकासारखा होता. दुःखाच्या या खाईत होरपळून निघण्याऐवजी त्याने स्वतःला लाल मातीच्या कुशीत झोकून दिले. हरियाणातील बिरोहर येथील लाल मातीचा आखाडा म्हणजे आता त्याच्यासाठी सर्वस्व होता. अंगाला माती लागली आणि उरात एक जाज्वल्य आग पेटली.

तिथून पुढचा प्रवास म्हणजे एका अखंड तपश्चर्येचा मार्ग होता. बिरोहरची माती अंगाला लावून तो दिल्लीच्या प्रसिद्ध 'छत्रसाल स्टेडियम'वर दाखल झाला. गुरु महाबली सतपाल,सुशील कुमार यासारखे दिगग्ज निर्माण झालेल्या ता तालमीत ललित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या हिऱ्याला खरे पैलू पडले. कुस्ती हेच आता त्याचे घर आणि कुस्ती हाच त्याचा श्वास. ऑलिम्पिक पात्रतेसाठी मे २०२४ मध्ये इस्तंबूलमध्ये कोटा मिळवताना त्याने दिवसाला तब्बल आठ-आठ तास कठोर सराव केला. घामाने भिजलेले शरीर, दुखापतींनी भरलेले अंग आणि तुटणारे स्नायू... पण डोळ्यांत एकच झळाळते स्वप्न होते. भारताचा तिरंगा!

मॅटवर तो उतरला की वाऱ्यासारखा फिरतो. त्याची कुस्ती शैली म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा एक जिवंत थरार आहे. कमालीचा वेग आणि आक्रमक अंदाज हे त्याचे हुकमी एक्के. प्रतिस्पर्ध्याला क्षणभराचीही विश्रांती न देणारी त्याची सततची हालचाल समोरच्याला अक्षरशः थकावून टाकते. तो थांबत नाही, तो थकत नाही. याच वेगाच्या आणि आक्रमकतेच्या जोरावर त्याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ गाठले आणि तिथेही कांस्यपदकाला गवसणी घालत थेट इतिहास रचला. भारताचा सर्वात कमी वयाचा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता ठरण्याचा वैभवशाली बहुमान त्याने आपल्या नावे केला.

पण यश कधीच सरळ रेषेत येत नाही! ऑलिम्पिकच्या त्या ऐतिहासिक यशानंतर दुखापतीने त्याला गाठले. एशियन चॅम्पियनशिपला त्याला मुकावे लागले. दुखापतीचे हे ग्रहण सुटते न सुटते तोच, २०२५ च्या जागतिक स्पर्धेत (World Championship) पोटाच्या आजारामुळे तो वजन देऊ शकला नाही आणि अपात्रतेची नामुष्की त्याच्यावर ओढवली. तो प्रसंग म्हणजे मनाला आतून तोडून टाकणारा होता. जगाच्या नजरा रोखलेल्या असताना अशी माघार घेणे कोणत्याही खेळाडूसाठी जिव्हारी लागणारे असते. पण हा गडी खचला नाही! उसळून परत येणे हे त्याच्या रक्तातच होते. मंगोलियातील रँकिंग स्पर्धेत कांस्य आणि त्यानंतर जून २०२५ मध्ये तुर्की इंटरनॅशनल स्पर्धेत थेट सुवर्ण जिंकून त्याने जोरदार पुनरागमन केले.

आणि मग उजाडली ती एशियन गेम्सची पहाट. ५७ किलो फ्रीस्टाईलचा तो आखाडा त्याची वाट पाहत होता. उपांत्य फेरीत ताजिकिस्तानच्या ऐयाल बेलोल्यूब्स्की याला १४-८ असे आस्मान दाखवत त्याने अंतिम फेरी गाठली होती. त्याची ही वाटचाल म्हणजे केवळ एका स्पर्धेतील विजय नाही, तर गेली कित्येक वर्षे त्याने गाळलेला घाम, १७ वर्षांखालील गटात २०१९ मध्ये मिळवलेले एशियन सुवर्ण, २०१८ आणि २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशिपचे कांस्य, तसेच २३ वर्षांखालील २०२२ च्या वर्ल्ड आणि एशियन चॅम्पियनशिपमधले सुवर्णपदक या सर्वांची ती शिदोरी होती. सीनियर एशियन चॅम्पियनशिप २०२३ मधील सुवर्ण आणि २०२६ मधील रौप्यपदक त्याच्या याच सातत्याची साक्ष देत होते.

अंतिम सामन्यात त्याने दाखवलेला तो हिसका आणि प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवण्याची ती जिद्द पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ज्या पोराने वयाच्या अकराव्या वर्षी सर्वस्व गमावले होते, तो आज आशिया खंडाचा मुकुटमणी झाला होता. अनाथपणाच्या काळोखातून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आज आशियाई सुवर्णपदकाच्या लखलखत्या प्रकाशात उभा आहे. अमन सहरावत हे आता केवळ एक नाव राहिलेले नाही, तर ती एक धगधगती प्रेरणा आहे. संकटांच्या छाताडावर पाय देऊन विजयाचे शिखर कसे सर करावे, याचा तो चालताबोलता इतिहास आहे!

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

*वस्ताद काकासाहेब पवार यांना पद्मश्री पुरस्काराची मागणी जनतेतून होत आहे : अर्जुनवीर पै. काकासाहेब पवार यांच्या जन्मदिवसा...
03/10/2026

*वस्ताद काकासाहेब पवार यांना पद्मश्री पुरस्काराची मागणी जनतेतून होत आहे : अर्जुनवीर पै. काकासाहेब पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त आजचा खास लेख!*

लातूर जिल्ह्याची भूमी.रोजचा नवा संघर्ष. घामाच्या धारांनी अंगावरची माती भिजवणारी रांगडी पोरं. ही भूमी शूरवीरांची खाण. इथे जन्म घेणारी माणसं अतिशय चिवट. प्राणावर बेतलं तरी तत्त्व न सोडणारी. याच रांगड्या परंपरेतील एक झळाळता मेरुमणी आणि कुस्तीक्षेत्रातील वादळ म्हणजे पै. काकासाहेब पवार.

३ ऑक्टोबर १९७०. 'साई' नावाच्या छोट्याशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात या नररत्नाचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. तुटपुंजी जिरायती जमीन. निसर्गाने साथ दिली तर दोन दाणे पदरात पडायचे.पण आजोबा पै. नारायण पवार हे पंचक्रोशीतील नावाजलेले पैलवान. त्यांच्याच रक्तातला कुस्तीचा जाज्वल्य निखारा पुढच्या पिढीत उतरला. विठ्ठल, महादेव, काकासाहेब, हनुमंत आणि गोविंद ही पाच भावंडे. मल्लविद्येचा समतोल राखण्यासाठी नियतीनेच जणू या पाच भावंडांना जन्माला घातले. प्रत्येकाच्या अंगात निसर्गाचे एकेक चमत्कारिक गुण ठासून भरलेले.
काकांनी गावातल्या तालमीत लाल माती कपाळी लावली. रानात रक्ताचं पाणी करायचं. काबाडकष्ट करायचे. पुन्हा तालमीत कुस्तीची जीवतोड मेहनत. गावात तगडी लढत मिळेनाशी झाली. हे वादळ छोट्या आखाड्यात थोपवणं आता शक्य नव्हतं. थोरले बंधू पै. विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काकांनी थेट कोल्हापूरचा रस्ता धरला. कोल्हापूर म्हणजे त्याकाळी मल्लांचे माहेरघर! गावागावांतून आलेली पोरं कोल्हापुरात दाखल होत होती. सगळे आखाडे हाऊसफुल्ल. या गर्दीत नवोदित काकांना प्रवेश नाकारला गेला. दरवाजे बंद झाले! पुढे काय? सगळं संपलं?
नाही! वादळ कधी बंद दरवाजांची पर्वा करत नाही. नशीब जेव्हा एक दार बंद करतं, तेव्हा यशाचं दुसरं महाद्वार उघडतं. काकांची पावलं सांगलीच्या वसंतदादा कुस्ती केंद्राकडे वळली. तिथे गुरुवर्य पै. दिनकरराव सूर्यवंशी नावाचा कुस्तीतला भलामोठा वटवृक्ष उभा होता. सूर्यवंशी सरांनी काकांच्या डोळ्यांतली आग अचूक हेरली. त्यांना प्रवेश दिला पण,त्यांच्यातली चमक ओळखून त्यांना पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालमीत, थेट रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला. पुन्हा एकदा पेटी उचलून ते पुण्याच्या रस्त्याला लागले.

पुण्याची गोकुळ वस्ताद तालीम म्हणजे त्याकाळी महाराष्ट्राच्या कुस्तीचा सर्वोच्च बुरूज. बिराजदार मामा म्हणजे अस्सल रत्नपारखी. मातीतल्या एखाद्या पोराकडे नुसतं पाहिलं तरी हा पोरगा राज्य, राष्ट्र की आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान मारणार, हे ते अचूक ओळखायचे. मामांनी काकांमधला अर्जुन हेरला. या हिऱ्याला पैलू पाडायला सुरुवात केली. पहाटे उठण्यापासून ते रात्रीच्या विश्रांतीपर्यंतचा प्रत्येक क्षण कुस्तीसाठीच खर्च होऊ लागला. पण यशाचा मार्ग सोपा नसतो. संकटांनी पुन्हा डाव टाकला. गावाकडे सलग तीन वर्षे भयंकर दुष्काळ. पैशाचा ओघ पूर्णपणे आटला. खिशात दमडी नाही. आंतरराष्ट्रीय मल्ल होण्याचं स्वप्न सोडून, पोटापाण्यासाठी यात्रा-जत्रांमधल्या कुस्त्या खेळण्याची वेळ काकांवर आली. आता कुस्ती सुटणार? आंतरराष्ट्रीय स्वप्न मातीत मिसळणार?
नाही! बिराजदार मामांच्या हे लक्षात आले. त्यांनी तातडीने परिसरातील साखर कारखान्यांचे मानधन काकांना सुरू करून दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे वस्ताद शामराव यादव यांनी त्यांची कायमस्वरूपी दुधाची सोय केली. खराडीचे कुस्ती भीष्माचार्य पंढरीनाथ पठारे यांनी मदतीचा हात पुढे केला. "तू फक्त कुस्ती खेळ, पैशाची चिंता आम्ही करू!" हा तो शब्द होता ज्याने एका नव्या आणि वैभवशाली इतिहासाला जन्म दिला.

यानंतर मात्र काकांनी मागे वळून पाहिलेच नाही. हे वादळ तालुका, जिल्हा आणि राज्याच्या सीमा भेदत देशात धुमाकूळ घालू लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भल्याभल्या सुरमा मल्लांची त्यांनी अक्षरशः फन्ना उडवली. एक काळ असा होता की स्पर्धेत 'काका पवार' हे नाव उच्चारले की भलेभले लढवय्ये मल्ल वजन न देताच माघार घेत. त्यांना माहिती होते, काकांशी कुस्ती म्हणजे १०-० ने हमखास पराभव! ग्रीको-रोमन असो किंवा फ्रीस्टाईल, मॅटवर काकांचे 'थ्रो' बघायला कुस्तीप्रेमींची स्टेडियमवर तोबा गर्दी उसळायची. मॅटवर एकदा का प्रतिस्पर्धी खाली सापडला, की उडणाऱ्या पत्रावळीसारखी त्याची अवस्था व्हायची. सलग दहा वर्षे वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १० सुवर्णपदके! पिंपरी चिंचवड, चंदीगड, दिल्ली, हैदराबाद, नाशिक... जिथे गेले तिथे सुवर्णाची लयलूट. आंतरराष्ट्रीय स्तरावर बगदाद, ग्रीस, रशियात पदकांचा पाऊस. तब्बल ३१ आंतरराष्ट्रीय पदके आणि १४ राष्ट्रीय पदके! गदा आणि ढालींची तर मोजदादच नाही. अंगावर काटा आणणाऱ्या या झंझावाती कारकिर्दीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने १९९० मध्ये त्यांना 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार' देऊन गौरवले. तर १९९८ साली भारत सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा 'अर्जुन पुरस्कार' देऊन त्यांच्या कीर्तिमुकुटात मानाचा तुरा रोवला.
कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर काका स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी पुण्यात 'आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल' उभारून मल्लविद्येची एक नवी प्रयोगशाळाच सुरू केली. आज तिथे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे यांसारखे आंतरराष्ट्रीय मल्ल घडत आहेत.राहुल सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ACP पदावर आहे.हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी,महाराष्ट्र चॅम्पियन असे कित्येक ढाणे वाघ काकांनी लाल मातीत आणि मॅटवर तयार केले. मॅटची कुस्ती जितकी महत्त्वाची, तितकीच मातीची कुस्ती टिकली पाहिजे यासाठी दिल्लीच्या मल्लांशी दोन हात करू शकणारी भक्कम फळी त्यांनी महाराष्ट्रात उभी केली. केवळ मल्ल घडवून ते थांबले नाहीत, तर शंभरहून अधिक मल्लांना भारतीय रेल्वेत नोकऱ्या लावून देऊन त्यांनी अनेकांच्या आयुष्याचे सोने केले. आजही प्रत्येक मैदानात काका आणि त्यांचे बंधू गोविंद तात्या पवार स्वतः हजर राहून पोरांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतात.
रोज सलग चार-चार तास हा अर्जुनवीर तालमीत पोरांचा सराव घेतो. पोरं घामाने भिजतातच, पण वस्तादही ओरडून घामाघूम होतो! कशासाठी हा अट्टाहास? कुणी जिंकलेली चांदीची गदा आणून देणार आहे? नाही. यामागे फक्त एकच ध्यास. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले जावेत. जोवर आकाशात चंद्र-सूर्य आहेत, तोवर माझ्या महाराष्ट्राचे नाव कुस्तीक्षेत्रात अमर राहावे. एवढे उत्तुंग कर्तृत्व, एवढा दैदिप्यमान इतिहास पाठीशी असूनही हा अवलिया अत्यंत साधे जीवन जगतो. कोणत्याही अपॉइंटमेंटविना सहज भेटणारा हा कुस्तीतला महर्षी खऱ्या अर्थाने मातीशी जोडलेला आहे.
आणि म्हणूनच, कुस्तीसाठी आपलं उभं आयुष्य जाळणाऱ्या या तपस्व्याला भारत सरकारने आता 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करायलाच हवे! काकासाहेब हे जणू कुस्तीतले द्रोणाचार्य आहेत, ज्यांनी स्वतःचे अर्जुनासारखे कर्तृत्व गाजवले आणि निवृत्तीनंतर शेकडो नवे अर्जुन घडवले. ग्रामीण भागातील शेकडो गरिबांच्या पोरांना नोकऱ्या मिळवून देऊन त्यांनी उभी केलेली ही सामाजिक क्रांती आहे. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून, कुस्तीप्रेमी जनतेतून एकच आग्रही आणि ठाम मागणी उठत आहे... काकासाहेब पवार यांना 'पद्मश्री' मिळायलाच हवा!

काकासाहेबांसारखी नररत्ने हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे जाज्वल्य भूषण आहेत. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच बहरत राहो. आई जगदंबा या अर्जुनवीराला उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून अशीच मल्लविद्येची अखंड सेवा घडत राहो, याच सदिच्छेसह या वादळी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा!

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

#काकासाहेब_पवार #पद्मश्री_काकासाहेब_पवार #अर्जुनवीर #कुस्तीमल्लविद्या #महाराष्ट्र_केसरी

जपानच्या भूमीवर भारतीय विजयाची गर्जना: एशियन गेम्स २०२६ मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक विजेत्या सुजित कलकलच्या सुवर्णमय विजयाच...
02/10/2026

जपानच्या भूमीवर भारतीय विजयाची गर्जना: एशियन गेम्स २०२६ मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक विजेत्या सुजित कलकलच्या सुवर्णमय विजयाच्या निमित्ताने आजचा खास लेख....

वेळ हातातून वाळूसारखी निसटत होती. गुणफलक २-९ असा खुणावत होता. जपानमधील कुस्तीच्या मॅटवर उभा असलेला ताजिकिस्तानचा अब्दुलमाजिद कुदिएव विजयाच्या उन्मादात होता. एक मिनिट आणि पंधरा सेकंद... केवळ एवढाच वेळ शिल्लक होता. समोर पराभव आ वासून उभा होता. स्टेडियममधील चाहत्यांचे श्वास रोखले गेले होते. जणू संपूर्ण आखाड्यात एक जीवघेणी शांतता पसरली होती. पण ज्याच्या नसानसात हरियाणामधील चरखी दादरीच्या मातीचा रांगडेपणा भिनला आहे, तो सहजासहजी हार कसा मानेल? हा कुस्तीचा आखाडा आहे! इथे शेवटच्या सेकंदापर्यंत श्वास आणि आशा जिवंत ठेवावी लागते. पराभवाच्या छायेत उभा असलेला तो तरुण मल्ल आतून पेटून उठला. सुजित कलकलच्या डोळ्यांत एक वेगळीच आग पेटली. त्याने स्वतःला सावरले. स्नायूंमध्ये प्राण ओतले आणि पुढच्या सव्वा मिनिटात जो थरार घडला, त्याने संपूर्ण आशिया खंडाला भारतीय मनगटाची खरी ताकद दाखवून दिली.
मॅटवरील घामाच्या प्रत्येक थेंबात जिद्द सळसळत होती. सुजितने कुदिएववर एखाद्या चवताळलेल्या वाघासारखी झेप घेतली. समोरचा प्रतिस्पर्धी तगडा होता, पण आता सुजितची आक्रमकता वादळासारखी घुमत होती. सलग चार टेकडाऊन! प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटवणारी ती चपळाई होती. अवघ्या ९० सेकंदात त्याने ८ गुणांची कमाई करत सामना १०-९ असा फिरवला! डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच हा चमत्कार घडला होता. कुदिएवला सावरण्याची संधीच मिळाली नाही. त्याचे पाय जड पडले आणि सुजितची पकड अधिकच घट्ट झाली. शेवटच्या दहा सेकंदांतील तो निर्णायक डाव म्हणजे जणू भारतीय कुस्तीच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. पंचांची शिट्टी वाजली आणि सुजितने आकाशाकडे पाहत विजयाची डरकाळी फोडली. तो गळ्यात चमकणारा सुवर्णपदकाचा झळाळता रंग हा जाज्वल्य परंपरेचे, अपार कष्टाचे आणि कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीचे जिवंत प्रतीक आहे.
हा सुवर्णवेध काही एका रात्रीत लागलेला नाही. या झळाळत्या यशामागे प्रचंड मोठा संघर्ष आणि रक्ताचे पाणी करणारी मेहनत उभी आहे. उपांत्य फेरीत सुजितची गाठ जपानच्या कोटारो कियोकाशी पडली होती. कियोका म्हणजे विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन! त्याच्याच घरच्या मैदानावर, हजारो जपानी प्रेक्षकांच्या गराड्यात त्याला हरवणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. सुरुवातीला ०-२ अशी पिछाडी. दबाव वाढत होता. पण तिथेही सुजितचा संयम ढळला नाही. तो शांत राहिला. त्याने आक्रमक डावपेच आखले, अचूक टायमिंग साधले आणि ३-३ अशी बरोबरी साधत तांत्रिक निकषांवर ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभवाची धूळ चारली. तो प्रसंग खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणणारा होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मल्लाला त्याच्याच मातृभूमीत चितपट करणे, हे साधे काम नाही. त्याआधी अफगाणिस्तानच्या सय्यद ओमरला १३-३ असे लोळवले आणि इराणच्या अब्बास इब्राहिमजादेहवर एकतर्फी वर्चस्व गाजवत त्याने अंतिम फेरी गाठली होती. प्रत्येक लढत ही जणू सुजितच्या अफाट ताकदीची, तंत्रशुद्धतेची आणि अदम्य आत्मविश्वासाची साक्ष देत होती.
भारतीय कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटाला एक वैभवशाली वारसा लाभला आहे. योगेश्वर दत्त आणि बजरंग पुनिया यांच्यासारख्या दिग्गजांनी याच गटात भारताचा दबदबा निर्माण केला. त्याच पावलावर पाऊल ठेवत सुजितने ही मक्तेदारी अत्यंत समर्थपणे पुढे चालवली आहे. ५ नोव्हेंबर २००२ रोजी जन्मलेल्या या तरुणाने कुस्तीचे बाळकडू त्याचे वडील आणि राष्ट्रीय मल्ल दयानंद कलकल यांच्याकडून घेतले. पहाटे उठून आखाड्यात गाळलेला घाम, लाल मातीशी जुळलेली नाळ आणि सिंथेटिक मॅटवर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, हा प्रवास अत्यंत खडतर होता. तासनतास चालणारा सराव, दुखापतींवर मात करण्याची जिद्द आणि डोळ्यांसमोर केवळ तिरंगा फडकवण्याचे एकमेव ध्येय, यामुळेच सुजित घडला. २०२५ मधील अंडर-२३ जागतिक चॅम्पियनशिपमधले सुवर्ण आणि आता एशियन गेम्समधील हे ऐतिहासिक पदक त्याच्यातील अद्वितीय गुणवत्तेची पावती देतात.
जेव्हा एखादा खेळाडू अत्यंत कठीण प्रसंगातून, खात्रीलायक पराभवाच्या दाढेतून उसळी मारतो, तेव्हा तो एक इतिहास घडवतो. सुजितचा हा विजय येणाऱ्या प्रत्येक तरुण पिढीसाठी, प्रत्येक नवोदित मल्लासाठी एक धगधगता अंगार आहे. जोपर्यंत वेळेची शेवटची सेकंद संपत नाही, तोपर्यंत डाव पलटण्याची ताकद स्वतःच्या मनगटात आणि प्रबळ इच्छाशक्तीत असते, हे त्याने या ऐतिहासिक कामगिरीतून जगाला ओरडून सांगितले आहे. आजचा हा विजय केवळ सुजितचा नाही, तर कुस्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रत्येक पैलवानाचा आहे.
जपानच्या त्या भव्य स्टेडियममध्ये जेव्हा भारताचा तिरंगा डौलाने वर गेला आणि राष्ट्रगीत निनादले, तेव्हा उपस्थित प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून आली. डोळ्यांच्या कडा आपसूक पाणावल्या. हा विजय आहे संयमाचा. हा विजय आहे अदम्य आत्मविश्वासाचा. हा विजय आहे भारतीय कुस्तीच्या एका नव्या, झळाळत्या आणि वैभवशाली युगाचा! सुजित कलकलच्या या सुवर्णमय प्रवासाला आणि त्याच्या अफाट जिद्दीला मानाचा मुजरा.

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

आज भारताचे दुसरे पंतप्रधान आणि ‘जय जवान, जय किसान’ या मंत्राने देशाला स्वाभिमानाचे बाळकडू पाजणारे महामानव लाल बहादूर शास...
02/10/2026

आज भारताचे दुसरे पंतप्रधान आणि ‘जय जवान, जय किसान’ या मंत्राने देशाला स्वाभिमानाचे बाळकडू पाजणारे महामानव लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आजचा खास लेख.....

सप्टेंबर १९६५ चा तो काळ. दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयातील घड्याळाचा काटा मध्यरात्रीकडे झुकत होता. सीमेवरून येणारे बिनतारी संदेश काळजाचा ठोका चुकवत होते. पाकिस्तानच्या अत्याधुनिक पॅटन रणगाड्यांची धडधड थेट भारतीय सीमा भेदून आत घुसत होती. हवेत गोळा बारुदाचा उग्र दर्प पसरला होता. शत्रूच्या लष्करशहांना वाटत होतं, अवघ्या पाच फूट दोन इंचांचा हा शांत, मितभाषी माणूस त्यांच्या अजस्र रणगाड्यांसमोर क्षणार्धात गुडघे टेकेल. पण त्याच रात्री त्या छोट्या चणीच्या देहातून एक निखारा उसळला. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख समोर उभे ठाकले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. आदेश काय असावा? हाच एक मोठा यक्षप्रश्न हवेत टांगलेला होता. त्या निवांत, खोल डोळ्यांच्या पंतप्रधानाने एका क्षणात नजर वर उचलली. चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती, थरकाप नव्हता. शांत पण पहाडासारखा खणखणीत आवाज त्या खोलीत घुमला, "तुम्ही कसलाही विचार करू नका. थेट लाहोरच्या दिशेने आगेकूच करा! सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे!" एका क्षणात युद्धाचे पारडे फिरले. एका शांत मुत्सद्याच्या पोलादी छातीतून निघालेला हा आदेश म्हणजे भारतीय सैन्याला मिळालेला स्वाभिमानाचा झळाळता श्वास होता.

कोण होता हा माणूस? ज्याने जागतिक महासत्तांच्या दबावाला पायाखाली तुडवून शत्रूच्या उरावर पाय ठेवण्याची धमक दाखवली?

२ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसरायच्या एका अत्यंत हलाखीच्या घरात जन्मलेला नन्हे. घरात अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांचे अकाली छत्र हरपलेले. पण त्या मातीच्या उदरातून निपजलेल्या पोराच्या डोळ्यांत एका धगधगत्या सूर्याचे तेज साठलेले होते. गंगा नदीच्या अथांग पात्राकडे पाहत शाळेत जाण्यासाठी उभा असलेला तो लहानगा पोरगा आठवा. खिशात नावेत बसण्यासाठी दमडीही नाही. काय केले असेल त्या पोराने? तो तिथे उभा राहून रडत बसला नाही. पाठीवरची दप्तराची पिशवी डोक्याला बांधली आणि त्या प्रचंड, खवळलेल्या गंगेच्या प्रवाहात उडी घेतली. छातीच्या ताकदीवर तो अखंड प्रवाह कापत तो पैलतीरावर पोहोचला. नियतीशी अशी समोरासमोर झुंज देण्याची हीच ताकद पुढे जाऊन अखंड भारताचे नेतृत्व करणार होती.

स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात हा युवक पूर्ण ताकदीने उतरला. तुरुंगवासाचे सत्र सुरू झाले. शरीर खंगत होते, पण मन वणव्यासारखे पेटत होते. एकदा त्यांची मुलगी मृत्यूच्या दाढेत असताना त्यांना काही दिवसांचा पॅरोल मिळाला. त्या बापाचे हृदय पिळवटून निघाले होते. मुलगी डोळ्यांसमोर देवाघरी गेली. अंत्यसंस्कार संपले आणि ठरलेली मुदत संपण्याआधीच हा कर्मयोगी पुन्हा तुरुंगाच्या लोखंडी गजांमागे जाऊन उभा राहिला. देशाच्या स्वाभिमानापुढे स्वतःचे वैयक्तिक दुःखाचे डोंगरही त्यांनी तृणवत मानले. निस्पृहतेचा असा ज्वलंत आविष्कार क्वचितच या पृथ्वीतलावर घडला असेल.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या रेल्वेमंत्रिपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. सत्ता, प्रतिष्ठा आणि लाल दिव्याची गाडी दारात असतानाही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. एका रेल्वे अपघाताची बातमी आली. अपघात भीषण होता, चित्तथरारक होता. तंत्रज्ञानाच्या त्रुटीमुळे झालेला तो अपघात होता, पण या माणसाच्या संवेदनशील अंतःकरणाने स्वतःला अपराधी मानले. कसलाही क्षणभर विचार न करता, कोणावरही दोष न ढकलता त्यांनी तातडीने आपला राजीनामा पंतप्रधानांच्या हातात सोपवला. जबाबदारी आणि नैतिकतेचे हे उत्तुंग शिखर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अजरामर झाले.

जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर जेव्हा देशाची सूत्रे शास्त्रीजींच्या हातात आली, तेव्हा देश चोहोबाजूंनी संकटांच्या खाईत लोटला गेला होता. एका बाजूला अन्नाचा भीषण दुष्काळ, अन्नासाठी अमेरिकेच्या जहाजांवर अवलंबून राहावे लागणारे परावलंबी जिणे; तर दुसऱ्या बाजूला सीमेवर वखवखलेल्या लांडग्यांसारखा दबा धरून बसलेला शत्रू. अशा अभूतपूर्व संकटात या माणसाने देशवासीयांच्या आत्मसन्मानाला हाक दिली. त्यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरून एक हुंकार दिला, "जय जवान, जय किसान!"

हा केवळ एक घोषणा नव्हती, तर कोटी-कोटी भारतीयांच्या मनगटात रक्त पेटवणारा महामंत्र होता. त्यांनी देशातील जनतेला आवाहन केले, "आठवड्यातून एक दिवस उपवास करा, पण कोणापुढे अन्नाची भीक मागू नका." आणि हे सांगण्याआधी स्वतःच्या घरातल्या चुलीवर एक दिवस स्वयंपाक न करण्याचा कडक नियम त्यांनी स्वतः लागू केला. ज्या नेत्याच्या आचरणात आणि उच्चारणात एक कणभरही अंतर नव्हते, त्याच्या एका शब्दावर अख्ख्या देशाने एका वेळेचे जेवण सोडले. सोमवारी देशभरातील हॉटेल्स बंद राहू लागली. शेताच्या बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याने घामाची धार लावून धान्याची कोठारे भरण्याचा विडा उचलला, तर बर्फाच्छादित शिखरांवर उभ्या असलेल्या जवानाने छातीचा कोट करून देशाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. हरितक्रांती आणि धवलक्रांतीची पहिली तेजस्वी बीजे याच साध्या माणसाच्या दूरदृष्टीतून पेरली गेली.

आणि मग उजाडले ते १९६५ चे युद्ध. अमेरिकेने भारताला धमकावले, "युद्ध थांबवले नाही तर पी.एल. ४८० अंतर्गत मिळणारा गहू बंद करू." शास्त्रीजींच्या चेहऱ्यावर एक हलकेच स्मित उमटले. ते म्हणाले, "आम्ही उपाशी राहू, पण देशाच्या सार्वभौमत्वाचा सौदा कधीही करणार नाही." भारतीय रणगाडे सियालकोट आणि लाहोरच्या वेशीवर धडकले. शत्रूची मस्ती धुळीस मिळाली. ज्या पायदळाला तुच्छ लेखले जात होते, त्याच जवानांनी शत्रूच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची राखरांगोळी केली. अवघ्या जगाने तोंडात बोटे घातली. एका साध्या, धोतर आणि बंडी नेसणाऱ्या माणसाने जगातील बड्या सत्तांना नमवून भारताचा तिरंगा डौलाने फडकवला होता.

त्यांचे जीवन म्हणजे पारदर्शकतेचा एक वाहता झरा होते. पंतप्रधान असतानाही त्यांच्याकडे स्वतःचे साधे घर नव्हते. एका जुन्या फियाट कारसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. स्वतःच्या मुलाला बढती मिळू नये म्हणून त्यांनी प्रशासनाला दिलेली ताकीद आजही राजकारणातील प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे. सत्तेचा अमर्याद दर्प आणि अहंकाराचा लवलेशही ज्यांच्या सावलीला शिवला नाही, अशा त्या त्यागी मूर्तीचे स्मरण आजही प्रत्येक भारतीयाच्या नसानसांत स्वाभिमानाचे स्फुलिंग चेतवते.

ताश्कंदच्या त्या गूढ आणि थंडगार रात्री, शांततेच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ११ जानेवारी १९६६ रोजी या महात्म्याने या जगाचा निरोप घेतला. भारताचा हा झळाळता सूर्य अचानक अस्ताला गेला. देश पोरका झाला, डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहिल्या, पण त्यांनी मागे सोडलेला पराक्रमाचा आणि स्वावलंबनाचा वारसा आजही अजरामर आहे. तो वारसा शेतात घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या नांगराच्या फाळात चमकतो आहे आणि सीमेवर बर्फात डोळ्यांत तेल घालून उभ्या असणाऱ्या जवानाच्या बंदुकीच्या गोळीत धडधडतो आहे. शास्त्रीजी म्हणजे भारतीय अस्मितेची ती पहाडी ढाल आहेत, जिच्यावर काळाचे कितीही घाव पडले तरी तिची चमक शतकानुशतके अशीच जाज्वल्य राहील!

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

पै.शहाजी (आबा) साळुंखे यांची चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या "प्रदेश प्रसिद्धी प्रमुख" पदी निवड...
01/10/2026

पै.शहाजी (आबा) साळुंखे यांची चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या
"प्रदेश प्रसिद्धी प्रमुख" पदी निवड

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू सहकारी, गेल्या दीड दशकापासून कुस्ती-मल्लविद्या क्षेत्रासाठी निःस्वार्थीपणे सेवा करणारे माझे बंधू पै. शहाजी आबा साळुंखे यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी सलग चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.

त्यांची ही फेरनिवड त्यांच्या कार्यावरील विश्वास, संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि कुस्ती क्षेत्राच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची पावती आहे. महासंघाच्या विविध उपक्रमांची, स्पर्धांची आणि कुस्ती क्षेत्रातील घडामोडींची प्रभावीपणे माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पै. शहाजी आबा साळुंखे यांची पुन्हा एकदा राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी निवड होत असल्याचा आम्हाला मनापासून आनंद आणि अभिमान आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

कुस्ती-मल्लविद्या क्षेत्राच्या सेवेसाठी त्यांची ही निष्ठावान वाटचाल अशीच अविरत सुरू राहो, हीच सदिच्छा.

Team Kustimallavidya

अभिनंदन...💐
01/10/2026

अभिनंदन...💐

आपल्या जादुई आणि भावपूर्ण संगीताने भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारे महान संगीतकार आणि गायक सचिन देव बर्मन (S. D. Bur...
01/10/2026

आपल्या जादुई आणि भावपूर्ण संगीताने भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारे महान संगीतकार आणि गायक सचिन देव बर्मन (S. D. Burman) यांच्या जयंतीनिमित्त आजचा खास लेख.

त्रिपुरा संस्थानचा अतिभव्य राजवाडा. चहुबाजूला पसरलेला राजेशाही थाट. दिमतीला उभे असलेले शेकडो नोकरचाकर आणि समोर सोन्याच्या ताटात वाढलेला घास. अंगावर रेशमी वस्त्रे आणि पायाशी लोळणारी सत्ता. पण या सर्व सुखांच्या गराड्यात एका तरुणाचा जीव मात्र प्रचंड घुसमटत होता. त्याला ही सत्ता नको होती! राजगादीचे ते खोटे वैभव त्याला खुणावत नव्हते. त्याच्या नसांत राजेशाही रक्त सळसळत होते, पण त्याच्या श्वासात एक वेगळेच वादळ घोंघावत होते. ते वादळ सुरांचे होते! राजेशाही सुखांचा एका क्षणात त्याग करून, अंगावरची ती झगमगती वस्त्रे झिडकारून या तरुणाने एक अज्ञात, खडतर आणि काटेरी रस्ता निवडला. हाती फक्त एक पेटी आणि ओठांवर लोकसंगीताची धून. स्वतःचे साम्राज्य स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या सुरांवर उभे करण्याचा तो एक महाभयंकर रणसंग्राम होता. तो राजपुत्र म्हणजे सचिन देव बर्मन!

कलकत्त्याची गल्ली ते मुंबईची मायानगरी. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मुंबई! एक अथांग आणि निर्दयी समुद्र. इथल्या लाटा रोज हजारो स्वप्ने एका घासात गिळंकृत करतात. या स्वप्नांच्या आणि स्पर्धेच्या बाजारात 'सचिनदा' एकटे उभे होते. खिशात पैसा नाही. पाठीवर कुणाचा भक्कम हात नाही. समोर आव्हानांचा प्रचंड मोठा डोंगर आ वासून उभा होता. सुरुवातीचे दिवस अतिशय अंधारलेले आणि नैराश्याने भरलेले होते. अपयश पदरी पडत होते. अनेकदा त्यांच्या संगीताची धाटणी नाकारली जात होती. पण या माणसाची जातकुळीच वेगळी! हार मानणे त्यांच्या रक्तातच नव्हते. स्टुडिओच्या चकरा मारून पायातले बूट झिजले, पण या माणसाचा कणा ताठ होता. छाती पुढे होती आणि नजर ध्येयावर खिळलेली होती. त्यांच्या डोळ्यांतील तो वज्रनिर्धार कोणत्याही संकटाला जाळून खाक करेल इतका प्रखर होता. त्यांनी आपला मार्ग स्वतः खणायला सुरुवात केली.
त्या काळात चित्रपटसृष्टीत दिग्गजांची मांदियाळी होती. एकापेक्षा एक मातब्बर संगीतकारांचा दरबार भरलेला असायचा. पाश्चात्य वाद्यांचा आणि भव्य ऑर्केस्ट्राचा तो काळ. या गर्दीत आपली वेगळी ओळख निर्माण करणे हे साक्षात एखाद्या वादळाशी दोन हात करण्यासारखेच होते. पण सचिनदांनी कोणाचीही नक्कल केली नाही. त्यांनी स्वतःचा मातीचा मार्ग निवडला. त्यांच्या संगीतात या देशाच्या मातीचा अस्सल गंध होता. बंगालच्या नद्या, तिथल्या होड्या चालवणाऱ्या मल्लाहांचे भाटियाली लोकसंगीत, ईशान्य भारताच्या दऱ्याखोऱ्यांत गुंजणारे गूढ सूर... हे सगळं त्यांनी आपल्या संगीतातून जिवंत केलं. जेव्हा चित्रपटसृष्टी पाश्चात्य वाद्यांच्या मागे धावत होती, तेव्हा सचिनदांनी भारतीय बासरी, सतार आणि तबल्याच्या नादावर कोट्यवधी हृदयांवर राज्य केले. त्यांची धून ऐकली की काळजाचा ठोका चुकायचा!

५० आणि ६० चे दशक. तो काळ म्हणजे सचिनदांचा एक अभूतपूर्व झंझावात! 'प्यासा', 'गाईड', 'बंदिनी', 'सुजाता', 'आराधना', 'अभिमान'... ही नावे म्हणजे केवळ चित्रपट नाहीत, तर ती भारतीय संगीताच्या इतिहासातील सुवर्णपाने आहेत. या माणसाने आपल्या संगीताने एका संपूर्ण पिढीला अक्षरशः वेड लावले. त्यांचे प्रत्येक गाणं म्हणजे एक गरुडझेप होती. लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, आणि किशोर कुमार यांसारख्या दिग्गजांकडून त्यांनी अचाट गाणी गाऊन घेतली. स्टुडिओत उभे राहिल्यावर सचिनदांचा एक वेगळाच दरारा असायचा. राजपुत्राची ती अंगभूत जरब त्यांच्या वागण्यात होती. सुरांच्या बाबतीत ते अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध होते. तडजोड हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता!
आणि त्यांचा तो आवाज! त्यांच्या आवाजात एक अशी रांगडी, भेदक आणि अस्वस्थ करणारी ताकद होती, जी थेट आत्म्याला भिडायची. तो आवाज गुळगुळीत नव्हता. त्यात निसर्गाचा रांगडेपणा होता. "वहां कौन है तेरा, मुसाफीर जाएगा कहाँ..." किंवा "सुन मेरे बंधू रे..." हे गाणं जेव्हा पडद्यावर वाजतं, तेव्हा तो फक्त एक गायक उरत नाही. तो साक्षात जीवनाचा तत्त्ववेत्ता बनतो. त्यांच्या आवाजातील तो दर्द, तो विरक्त भाव आणि ती अथांग शांतता श्रोत्यांच्या अंगावर आजही काटा आणते. त्यांचे गाणे म्हणजे काळजावर थेट घातलेला घाव!
यश मिळवणे सोपे असते, पण ते टिकवणे आणि एका दशकानंतर दुसऱ्या दशकात स्वतःला पुन्हा नव्याने सिद्ध करणे, हा खऱ्या योद्ध्याचा गुण आहे. सचिनदांनी वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे सिद्ध केले. वय वाढत होते. शरीर थकत होते. पण आतला तो सुरांचा ज्वालामुखी अजूनही धगधगत होता. 'आराधना' चित्रपटाच्या वेळी ते गंभीर आजारी पडले. मृत्यू दारात उभा होता. पण या योद्ध्याने मृत्यूलाही आपल्या सुरांच्या ताकदीवर थोपवून धरले. रुग्णालयाच्या बिछान्यावर पडूनही त्यांनी संगीताचा विचार सोडला नाही. त्या स्थितीतही त्यांनी असा संगीत नजराणा दिला ज्याने किशोर कुमारला रातोरात सुपरस्टार बनवले. हा त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचा आणि संगीतावरील नितांत प्रेमाचा सर्वोच्च विजय होता.
आज त्यांचा जन्मदिवस. तो राजपुत्र ज्याने सिंहासनाचा त्याग करून सुरांचे सर्वोच्च शिखर गाठले. ज्याने कुठल्याही शस्त्राविना, केवळ आपल्या जादुई बोटांनी आणि काळजाला भिडणाऱ्या आवाजाने भारतीय संगीतसृष्टीवर निर्विवाद अधिराज्य गाजवले. सचिन देव बर्मन या नावाचा तो झळाळता सूर्य आजही आपल्या संगीतातून तितक्याच तेजाने तळपत आहे आणि उद्याही तळपत राहील! त्यांचे सूर म्हणजे काळाच्या छातीवर कोरलेला एक अमर शिलालेख आहे!

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

मराठी भाषेला नवसंजीवनी देणारे आधुनिक वाल्मिकी, महाकवी ग. दी. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त आजचा खास लेख...💐१ ऑक्टोबर १९१...
01/10/2026

मराठी भाषेला नवसंजीवनी देणारे आधुनिक वाल्मिकी, महाकवी ग. दी. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त आजचा खास लेख...💐

१ ऑक्टोबर १९१९. माणदेशातील शेटफळे नावाचे एक दुष्काळी खेडेगाव. सर्वत्र रखरखीत ऊन. उघडी गरम माती. गावच्या कुलकर्ण्यांच्या घरात आज एक धांदल उडाली होती. सून बाळंतपणासाठी आलेली. वेदनांचे हुंकार भिंतीपलीकडे ऐकू येत होते. वेळ अत्यंत कठीण. गावात कसलीही वैद्यकीय सुविधा नाही. संध्याकाळची वेळ. अंधार दाटून येत होता. गावच्या अनुभवी सुईणीने मोठ्या शर्थीने सुनेची सुटका केली. मुलगा जन्मला. सर्वांच्या चेहऱ्यावर क्षणभर आनंदाची लकेर उमटली. पण पुढच्याच क्षणी काळजाचा ठोका चुकला. बाळ काही रडेना! ते नवजात बाळ निपचित पडून होते. शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कुणी पायाला घासले. कुणी पाठीवर थाप मारली. बाळ कसलाच दाद देईना. श्वासोच्छवास जाणवत नव्हता. जीवघेणी शांतता पसरली.गंभीर चेहऱ्याने नाडी तपासली. श्वास थांबलेला होता. त्यांनी अंतिम आणि कठोर निकाल सुनावला. जन्मजात मृत्यू!
त्या घरावर दुःखाचा भयंकर डोंगर कोसळला. आईने हंबरडा फोडला. घरामागच्या परसात अत्यंत जड अंतःकरणाने एक छोटा खड्डा खणला गेला. जन्मदाती आई आपल्या पोटच्या गोळ्याला सोडायला तयार नव्हती. नियती निष्ठुर होती. वडिलांनी थरथरत्या हातांनी तो निष्प्राण देह उचलला. पावले परसाच्या दिशेने वळली. आता माती देणार... इतक्यात एक खणखणीत आवाज घुमला! "थांबा!" ती म्हातारी सुईण ताडकन उठली. ती बाळंतिणीच्या बाजेकडे धीम्या पावलांनी धावली. तिथे शेकायला ठेवलेली एक कोळशाची शेगडी धुमसत होती. तिने थेट तो रसरसता, लालभडक निखारा चिमट्याने उचलला. धावतच ती परसात आली. मागेपुढे न पाहता तिने तो धगधगता निखारा थेट त्या निष्प्राण बाळाच्या बेंबीजवळ लावला! त्वचेला चटका बसला. देह शहारला. आणि काय आश्चर्य! तो निष्प्राण देह कळवळून रडला! अवघ्या शेटफळे गावाला जणू हुंदका आवरेना...आकाशाला भेदू पाहणारी ती किंकाळी हवेत घुमली आणि मृत्यूच्या छाताडावर पाय देऊन एका वादळाचा जन्म झाला. अवघ्या काही क्षणांची चूक झाली असती, तर परसातील त्या काळ्या मातीत महाराष्ट्राचा एक जाज्वल्य इतिहास कायमचा गाडला गेला असता. त्या म्हाताऱ्या सुईणीचे उपकार हा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. त्या रसरसत्या निखाऱ्याने संपूर्ण मराठी भाषेला एक अफाट आणि झळाळते वैभव मिळवून दिले. तो धगधगता निखारा त्या बाळाच्या रक्तात कायमचा भिनला आणि त्यातूनच उभा राहिला एक प्रचंड झंझावात. गजानन दिगंबर माडगूळकर. आपले गदिमा!

परिस्थितीशी त्यांचा हा जन्मजात संघर्ष पुढे आयुष्यभर चालला. दारिद्र्य आणि गरिबीच्या अक्राळविक्राळ डोंगराला त्यांनी थेट अंगावर घेतले. खिशात दमडी नाही. पायात चप्पल नाही. पोटाला भुकेचा जाळ. पण डोळ्यांत एक भयंकर आग! हातात फक्त एक लेखणी होती. ती लेखणी साक्षात एक वज्र होती. कोल्हापूरच्या भालजी पेंढारकरांच्या तालमीत या हिऱ्याला पैलू पडत होते. चित्रपटाच्या सेटवरील अंधाऱ्या कोपऱ्यात, मिळेल त्या कागदाच्या तुकड्यावर हा तरुण आपले आणि मराठी भाषेचे भविष्य लिहीत होता. कागदावर शाई सांडत नव्हती, तर अंगावर काटा आणणारे प्रसंग जिवंत होत होते. गदिमांच्या लेखणीचा वेग अफाट होता. एखाद्या बेफाम उधळलेल्या अश्वासारखी त्यांची लेखणी धावायची. जगाच्या पाठीवर असा दुसरा कवी झाला नसेल, ज्याने सिगारेटच्या रिकाम्या पाकिटावर, वर्तमानपत्राच्या कोऱ्या जागेवर, अगदी चहाच्या बिलाच्या मागील बाजूवरही अजरामर गीते लिहिली. निर्मात्याने चाल ऐकवली की पुढच्या दहा मिनिटांत गाणे लिहून तयार असायचे. हा कोणताही चमत्कार नव्हता. ही त्या माणसाच्या रक्तात भिनलेली साक्षात सरस्वती होती. त्यांनी मराठी साहित्यावर आणि चित्रपटसृष्टीवर थेट गरुडझेप घेतली.

१५७ पटकथा आणि २००० हून अधिक गीते! हा अवाढव्य आकडा माणसाची मती गुंग करणारा आहे.
त्यांच्या शब्दांत एक बेफाम नशा होती. एक वेगळाच ज्वर होता. कागदावर उतरणारा प्रत्येक शब्द घणाचे घाव घालत होता. गदिमांच्या प्रतिभेला कोणतीच सीमा नव्हती. एका बाजूला "घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला" म्हणत पहाटेचे अत्यंत लोभस आणि तरल चित्र हुबेहूब उभे करणारी ही लेखणी, दुसऱ्या क्षणी "विठ्ठला तू वेडा कुंभार" म्हणत जीवनातील अत्यंत प्रगल्भ तत्त्वज्ञान क्षणार्धात उलगडून दाखवायची. मुलांसाठी "नाच रे मोरा, आंब्याच्या वनात" लिहून बालमनावर मोरपीस फिरवणारा हाच तो कवी होता, आणि "बुगडी माझी सांडली गं" किंवा "फड सांभाळ तुऱ्याला आला" म्हणत अस्सल लावणीचा ज्वर उभा करणाराही हाच तो रांगडा गडी होता. मानवी भावनांचा असा कोणताही रंग नाही, जो या शब्दांच्या बादशहाने आपल्या कुंचल्याने रंगवला नाही. शृंगार, वीररस, भक्ती आणि करुणा... गदिमांची लेखणी प्रत्येक आखाड्यात अजिंक्य ठरली.
आणि मग आला तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णक्षण! 'गीत रामायण'. सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचे दैवी सूर आणि गदिमांचे वज्राहून कठोर आणि फुलाहून कोमल शब्द. या दोन दिग्गजांनी मिळून घडवलेला हा एक प्रचंड मोठा भूकंप होता. रविवारी सकाळी आकाशवाणीवर ज्या वेळी 'गीत रामायण' लागायचे, तेव्हा महाराष्ट्रातील रस्ते निर्मनुष्य व्हायचे. लोक रेडिओसमोर चपला काढून, उदबत्ती लावून, हात जोडून बसायचे. "स्वये श्री रामप्रभू ऐकती..." ही ओळ कानावर पडताच सर्वांगावर काटा यायचा. रामायणातील प्रसंग कानावर पडताना ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहायच्या. हे यश होते त्या संघर्षाचे. हे यश होते त्या भुकेल्या, उघड्या दिवसांचे, ज्यांनी गदिमांना आतून पोलादासारखे घडवले होते. प्रभू रामचंद्रांचे चरित्र घरोघरी पोहोचवणारा हा कवी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा 'आधुनिक वाल्मिकी' ठरला.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात गदिमांचे स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्यासारखे आहे. आयुष्य हे कधीच सोपे नसते. संकटांची चक्रीवादळे जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात घोंघावली, जेव्हा निराशा आणि दुःखाने मला चारही बाजूंनी घेरले, तेव्हा गदिमांचे शब्द माझ्यासाठी साक्षात तारणहार ठरले. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे शब्द कानावर पडले की या जीवघेण्या संघर्षाला भिडण्याची एक नवी आणि अफाट ताकद अंगात संचारते. त्यांच्या शब्दांतील तत्त्वज्ञानाने मला वारंवार नव्याने उभे केले आहे.त्यांचे प्रत्येक गीत हे राखेतून उभे राहण्याची प्रचंड ऊर्जा देणारा धगधगता अंगार आहे.
ज्या माणसाने शब्दांचे इतके अवाढव्य साम्राज्य उभे केले, तो कधीच मरू शकत नाही. जोवर सह्याद्रीचे कडे ताठ आहेत आणि या मातीत मराठी श्वास घेत आहे, तोवर गदिमांचे हे झळाळते वैभव असेच तळपत राहील. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या महाकवीला, शब्दांच्या या जादूगाराला आणि जाज्वल्य प्रतिभेच्या धनी माणसाला माझा शतशः प्रणाम आणि मानाचा मुजरा!

धन्यवाद
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ

#गदिमा

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category