10/06/2026
गरजू सर्वसामान्यांची पडताळणी करूनच घरकुले देण्याची
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची सूचना
निपाणी : गरजू सर्वसामान्यांची पडताळणी करूनच घरकुले देण्याची सूचना बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केली आहे. आज बुधवार दिनांक 10 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना करताना घरकुल वाटप पारदर्शक व्हावे आणि ते योग्य लाभार्थ्यांना मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी हद्दीत दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी प्लस-२ घरांचे वाटप गरजू सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावे, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सदोष करावी अशी मागणी केली होती. दिनांक 20 मे रोजी विद्यमान आमदार व माजी खासदारांनी लाभार्थ्यांची यादी सदोष न बनविता ड्राॅ पद्धतीने घरकुल वाटप करण्याचा घातलेला घाट आम्ही सर्व सामान्यांचे हित जोपासून हाणून पाडला. मुळातच आश्रय समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे या समितीचा अध्यक्ष सुद्धा अस्तित्वात नसल्याने सध्या जिल्हाधिकारी हे अध्यक्ष म्हणून या समितीवर काम पाहत आहेत. आम्ही मागणी केल्यानुसार प्रशासनाने 1012 लाभार्थ्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती (सर्व्हे) घेण्याचे काम सुरू आहे.
दि. 12 जून पर्यंत हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सध्या या घरकुल लाभार्थ्यांच्या सर्व्हेदरम्यान डोळ्यात तेल घालून काम करावे. आपल्या शेजारी असलेल्या लाभार्थी जरी गडगंज असला तरी त्याची तक्रार करावी. जेणेकरून पैसे भरलेल्या मूळ लाभार्थ्यालाच हक्काचे घर मिळावे, असे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले.
चिंगळे म्हणाले, दि. 20 मे रोजी झालेला घरकुल वितरण गोंधळाबाबत अनेक लाभार्थ्यांमध्ये गैरसमज पसरला आहे. मात्र आम्ही कोणाचेही घर हिसकावून घेतले नाही. मुळात घरे किती तयार आहेत? हा प्रश्न असला तरी ज्यांनी पैसे भरले आहेत अशा सर्वांनाच ड्रॉ मध्ये समावेश करून घ्यावे अशी आग्रही मागणी आमची होती. पहिल्या टप्प्यात 600 जणांची यादी ड्रॉमध्ये ठेवण्यात आली. मात्र आम्ही विरोध केल्याने पुन्हा 200 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला मात्र यामध्ये पैसे भरलेले लाभार्थी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी सुधारित यादी जाहीर केली जाईल मगच वितरण होईल असे जाहीर केले. त्यानंतर आपण सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी,खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळेच प्रशासनाने यादी पडताळणीचे काम चालवले यामध्ये लाभार्थ्यांकडून पैसे भरलेले पावती घेऊन सुधारित यादी तयार करून ही फलकावर प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांनाच घरे मिळावीत यामध्ये 4 हप्ते भरलेल्या या सर्वांचा समावेश असावा अशी मागणी आमची होती. ज्येष्ठतेप्रमाणे लाभार्थ्यांची नावे असावीत अशी कुठलीही बाब नमूद नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी घर मिळाल्यानंतर 10 दिवसापर्यंत आपापल्या मर्जीनुसार ग्रुप करून त्यांना वास्तव्य करण्याचा अधिकार आहे. असे असताना विद्यमान आमदार व माजी खासदारांनी हा गोंधळ घडवून आणला. दिनांक 1 जुनपुर्वी पैसे भरलेल्या सर्वांचीच बँक पावती मागून प्रशासनाने सध्या यादी प्रसिद्ध करून सर्व्हे चालविला आहे. या सर्व्हेच्या माध्यामातून लाभार्थ्यांची योग्य ती चौकशी होणार आहे.खरोखरच जे लाभार्थी नाहीत अशांना यातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 12 पर्यंत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांच्या वर लक्ष ठेवावे तरच हे काम सोपे होणार आहे चुकीच्या पद्धतीने कोणालाही या योजनेचा लाभ मिळू नये ही आमची भूमिका आहे.
सध्या प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार घरकुल वाटपात पारदर्शकता असावी अशी आमची आग्रही भूमिका आहे त्यामुळे विनाविलंब तपास पथके कार्यरत करून अंतिम यादी तयार केली आहे त्यामुळे निश्चितच या घरकुलाचा लाभ मिळणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निपाणी ब्लॉक काॅंग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, सुजय पाटील, वैभव पाटील, किरण कोकरे, प्रवीण हेगडे, विश्वास पाटील,ॲड. प्रदीप पाटील, अब्बास फरास, विनोद बळळारी, फारूक गवंडी, अस्लम शिकलगार, दिपक ढणाल, संजय सांगावकर, जरारखान पठाण, जयश्री लाखे, मंगल घोरपडे, बबन चौगुले, कल्पना पुजारी, रेश्मा चिपळूणकर, स्नेहल माने, सलमा शेख यांच्यासह काॅंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
----
10/06/2026
अल्पवयीन दलित मुलीची आत्महत्या : आरोपी फरार ?
धारवाड : धारवाड तालुक्यातील गरग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन दलित मुलीच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात नहिम बेग नावाच्या तरुणाविरुद्ध पॉक्सो (POCSO), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आरोपी फरार असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, नहिम बेग याने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्या मुलीला प्रेमात पाडले. प्रेम जुळल्यानंतर मुलगी बुरखा परिधान करून त्याच्यासोबत फिरु लागली. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला समज दिली. यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले. मात्र, नहिमने मुलीशी संपर्क कायम ठेवला होता. त्याने दिलेल्या मोबाईलद्वारे दोघांमध्ये व्हिडिओ कॉलवर संवाद सुरू असल्याचा आरोप आहे. तसेच, मुलगी बुरख्यात असतानाचा दोघांचा एकत्रित फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, 8 मे रोजी संबंधित मुलीने आत्महत्या केली. यानंतर तिच्या पालकांनी गरग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार नहिम बेगविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मात्र, पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असूनही एफआयआर दाखल होऊन महिनाभर उलटल्यानंतरही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पीडित मुलीचे कुटुंब न्याय मागत असून, आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
10/06/2026
वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात शेतकऱ्यांनी छेडले आंदोलन ...!
अथणी : अथणी येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या वीज क्षेत्र खासगीकरणाच्या हालचालींविरोधात जोरदार आंदोलन छेडले. सरकारच्या निर्णयाचा निषेध करत शेतकऱ्यांनी तालुका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. "वीज क्षेत्राचे पूर्णपणे खासगीकरण झाल्यास शेतकऱ्यांना मिळणारी मोफत वीज बंद होईल. तसेच शेतातील ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्चही शेतकऱ्यांनाच उचलावा लागेल. यामुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान होईल," असे आंदोलकांनी यावेळी म्हटले.
"सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द न केल्यास केवळ अथणीतच नव्हे तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल," असा ईशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
शेतकऱ्यांनी सरकारने वीज क्षेत्र खासगीकरणाचा निर्णय मागे घेऊन शेतकरी हिताचे धोरण राबवावे, अशी मागणी यावेळी केली.
10/06/2026
पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी चिक्कोडी प्रशासन सज्ज : नागरिकांच्या सुरक्षेसाठी व्यापक तयारी
चिक्कोडी : मान्सूनपूर्व काळात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी आणि निपाणी तालुक्यांमध्ये प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त (एसी) सुभाष संपगावी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन पथकाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
चिक्कोडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पूरकाळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
चिक्कोडी व निपाणी तालुक्यांतून वाहणाऱ्या कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा या तीन प्रमुख नद्या दरवर्षी पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडून वाहतात. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाकडून तातडीने प्रतिसाद दिला जाईल. बचावकार्यांसाठी पूरग्रस्त भागात एकूण 14 बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी तालुकाभरात 38 निवारा केंद्रांची (रिलीफ सेंटर्स) निश्चिती करण्यात आली असून आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे, असे यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी सांगितले.
10/06/2026
दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची कृतज्ञता भेट
बेळगाव : जिल्ह्यातील प्रामाणिक सराफ व्यावसायिकांच्या हितसंरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जिल्हा जागृती समिती स्थापनेच्या ऐतिहासिक आदेशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशन (एएम) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा व कृतज्ञता भेट घेतली. बेळगाव दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशन अध्यक्ष मणिक अणवेकर आणि सचिव वैभव वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही कृतज्ञता भेट घेतली.
सराफ व्यावसायिकांच्या हितसंरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला जिल्हा जागृती समिती स्थापनेचा ऐतिहासिक आदेश प्रशंसनीय आहे. जुने सोने-चांदी तसेच वापरलेल्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता, कायदेशीरता आणि पोलीस विभाग व सराफ व्यावसायिक यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगत असोसिएशनने जिखाधिकाऱ्यांची मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली,
तसेच आभार व्यक्त केले.
हा आदेश जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांना मोठे संरक्षण देणारा असून जिल्हा प्रशासनाचा दूरदृष्टीचा आणि आदर्श निर्णय असल्याचेही असोसिएशनने नमूद केले.
यावेळी कर्नाटक सरकारच्या कामगार विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत जिल्ह्यातील सुवर्णकारांना 1000 हून अधिक कामगार ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी असोसिएशनने बजावलेल्या भूमिकेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. असोसिएशनतर्फे आमंत्रित करण्यात आलेल्या काही लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात कामगार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशनच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत सुवर्णकार आणि सराफ समाजाच्या कल्याणासाठी संघटना करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सुवर्णकार आणि सराफ व्यावसायिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा सल्ला दिला. कर्नाटक सरकार व कामगार विभागाच्या विविध योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा जागृती समितीचे उद्दिष्ट, अधिकार, जबाबदाऱ्या आणि व्यावसायिकांनी पाळावयाच्या कायदेशीर प्रक्रियांबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जुने सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करताना पाळावयाचे नियम व घ्यावयाची काळजी याबाबत व्यापाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यास चोरीच्या मालाच्या व्यवहारांपासून दूर राहण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. यासाठी जिल्हास्तरीय भव्य जनजागृती कार्यक्रम लवकरात लवकर आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी असोसिएशनला केले.
अध्यक्ष मणिक अणवेकर आणि सचिव वैभव वेर्णेकर यांनी हा कार्यक्रम लवकरात लवकर आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक आणि सुवर्णकारांच्या हितसंरक्षण व विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि दैवज्ञ ज्वेलरी असोसिएशन यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
10/06/2026
काय सांगताय .....! वसतीगृहात विद्यार्थिनींची ओली पार्टी ..?
कलबुर्गी : विद्यार्थिनींनी चक्क महिला वसतीगृहात ओली पार्टी केल्याची बातमी असून तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे बोलले जात आहे.
कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील कडगंची येथील एका महिला वसतीगृहात हा प्रकार घडल्याची चर्चा असून विद्यार्थिनींनी मद्य ढोसत पार्टी केल्याचा आरोप समोर आला आहे. ही चर्चा शैक्षणिक क्षेत्रात बऱ्यापैकी रंगली आहे. मात्र, नेमके खरे काय ? हे स्पष्ट झालेले नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी वसतिगृहातील खोलीत बसून मद्यसेवन करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. विद्यार्थिनींनीच हा व्हिडिओ चित्रीत केल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे वसतीगृहातील सुरक्षा व्यवस्था आणि शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याच्या विविध भागांसह इतर राज्यांमधूनही अनेक विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत असल्याने या व्हिडीओने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत असली तरी संबंधित व्हिडिओची सत्यता आणि घटनेमागील वस्तुस्थिती तपासल्यानंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.
10/06/2026
....आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ' त्या ' बालकाला दिले ' यतीन ' असे नाव : भावनापूर्ण आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमाने झाले सारेच भावूक : जिल्हाधिकाऱ्यांनी जिंकली साऱ्यांचीच मनं ...!!
बेळगाव : सरकारी विशेष दत्तक केंद्रात दोन महिन्यांच्या एका बालकाचा नामकरण सोहळा पार पडला आणि या भावनास्पर्श सोहळ्याने सारेच उपस्थित भावूक झाले.
चक्क जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून त्या चिमुरड्याला नाव दिले ' यतीन '.
आधार नसलेल्या अवस्थेत सरकारी दत्तक केंद्रात दाखल झालेल्या दोन महिन्यांच्या एका बालकाला जिल्हाधिकारी यांनी "यतीन" हे नाव देत त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत चालविल्या जाणाऱ्या सरकारी विशेष दत्तक केंद्रात दाखल असलेल्या या बालकाचा नामकरण सोहळा शुक्रवारी पार पडला.
या सोहळ्याला उपस्थित राहून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी त्या चिमुकल्याचे विधिवत नामकरण केले. त्यांनी त्या बालकाला "यतीन" हे नाव दिले व त्याला आशीर्वाद दिला.
यतीन म्हणजे तपस्वी, संयमी, अनाथांचा नाथ. खरोखरच बेळगावला लाभलेल्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा सोहळा भावनापूर्ण आणि हृदयस्पर्शी असा केला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी "यतीन" या नावाचा अर्थ आणि बालकाच्या उज्ज्वल भवितव्याबाबत आपली भावना व्यक्त केली. "यतीन" म्हणजे अनाथांना आधार देणारा. हे बालक मोठे होऊन समाजात चांगले नाव कमवो आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य करो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
अनाथ मुलांच्या संरक्षणासाठी तसेच दत्तक प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
10/06/2026
रौडीशीटर्सना खाकीचा दणका ..!
बेळगाव : जिल्ह्यातील रौडीशीटर्सना खाकीने आज चांगलाच दणका दिला. जिल्हा पोलिसांनी आज शनिवारी सकाळी शहर व परिसरातील रौडीशीटर्सविरोधात धडक कारवाई करत त्यांच्या घरांवर छापे टाकून झाडाझडती घेतली.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात डीवायएसपी, सीपीआय, पीएसआय तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने 10 रौडीशीटर्सच्या घरांवर एकाचवेळी धाड टाकून तपासणी केली. विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटकांवर पोलिसांची विशेष नजर असून, त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अंकुश ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
10/06/2026
विद्यार्थ्यांना साडेचार हजार वह्यांचे वाटप : व्ही. पी. ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
निपाणी : गळतगासह परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना व्ही. पी. ग्रुपतर्फे सुमारे साडेचार हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या गळतगा येथील व्ही. पी. ग्रुपचे उद्योजक विठ्ठलराव पोळ व त्यांचे चिरंजीव गणेश पोळ यांच्या हस्ते गेल्या 10 वर्षांपासून विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. यंदाही गळतगासह परिसरातील सर्व शाळांमध्ये व्ही. पी. ग्रुपतर्फे सुमारे साडेचार हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे आयोजित कार्यक्रमात परिसरातील 8 सरकारी शाळांमधील 735 विद्यार्थ्यांना साडेचार हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
गणेश पोळ म्हणाले, शाळेच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात येईल. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनी सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. मान्यवरांसह उपस्थितांनी पोळ परिवाराने गेल्या 10 वर्षापासून शैक्षणिक साहित्य वितरण करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे सांगितले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जाधव, अरविंद इंगळे, विनायक मोरबाळे, दीपक गायकवाड, सुनील तिकुटे, सतीश निकम, कृष्णा घोटणे विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, एसडीएमसी सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
----
10/06/2026
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात निपाणीत धडक कारवाई :
पोलिसांकडून बुलेटसह तलवारी जप्त
निपाणी :
शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, निपाणी पोलिसांनी आज बुधवारी सकाळी विशेष मोहीम राबवून विविध भागांमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींच्या घरांवर छापे मारले. या कारवाई दरम्यान तलवार आणि एक नोंदणी नसलेली बुलेट बाईक जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार राबविण्यात आलेली ही कारवाई शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. 15 पेक्षा अधिक घरांची तपासणी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईत निपाणी शहर पोलीस स्टेशन, बसवेश्वर चौक पोलीस ठाणे, निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे, आणि खडकलाट पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
49 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी पहाटेच्या वेळी शहराच्या विविध भागांत मोहीम राबवली आणि 10 ते 15 सराईत गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी केली. त्यांच्या हालचाली, संपर्क आणि अवैध कृत्यांमधील सहभागाबद्दल माहिती गोळा करण्यात आली. तलवार, बुलेट बाईक जप्त करण्यात आली आहे. अरबाज मुल्ला यांच्या घरात एक तलवार सापडली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. शैलेंद्र बोंधळे यांची एक नोंदणी नसलेली बुलेट बाईकही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वस्तूंची तपासणी सुरू असून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
शहरात गुन्हेगारी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. गांजाची वाहतूक, विक्री, अवैध शस्त्रे, दहशत, खंडणी आणि इतर कोणत्याही अवैध कारवायांमध्ये कोणीही सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे कारवाईनंतर बोलताना मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात, गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीस विविध शहरांमध्ये विशेष मोहिमा राबवत आहे. अशा अचानक धाडींमुळे गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांवर केवळ मानसिक दबावच निर्माण होत नाही, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासही मदत होते.शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या काही दिवसांत अशा विशेष मोहिमा सुरूच राहतील, असे पोलिसांनी सांगितले. बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर सतत पाळत ठेवली जात असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या जलद कारवाईद्वारे पोलिसांनी गुन्हेगारी क्षेत्राला आता हे सारे काही थांबवा असा स्पष्ट संदेश दिला आहे.
---